गोवा : शिरगावच्या लैराई देवीच्या जत्रा उत्सवात चेंगराचेंगरी

गोव्यातील शिरगाव (Shirgaon) येथील लैराई देवीच्या यात्रेत झालेल्या चेंगरा चेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 70 भाविक जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींना उपचारासाठी डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेऊन चौकशी केली. तसंच त्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करुन माहिती घेतली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक या देवीच्या उत्सवासाठी मंदिरात जमले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. उत्तर गोव्यातील शिरगाव (Shirgaon) येथे दरवर्षी लैराई देवीची जत्रा आयोजित केली जाते. यात रात्री पारंपरिक मिरवणूक काढली जाते. यावर्षीही 2 मे रोजी रात्री ही मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. यावर्षी अंदाजे 40 ते 50 हजार लोक सहभागी झाले होते.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मिरवणुकीदरम्यान एका ठिकाणी उतार असल्याने, गर्दी एकत्रितपणे वेगाने चालायला लागली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, या गोंधळानं काही लोक पडले आणि त्यानंतर एकमेकांवर पडू लागल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक जण चिरडले गेले. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 70 जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत घटनेबाबत माहिती दिली आहे. “आज सकाळी शिरगाव येथील लैराई जत्रेत झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीमुळं मी खूप दुःखी आहे,” असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही दिली.

“आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी बोलून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दिला,” असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

“दरवर्षी या उत्सवात 50,000 हून अधिक लोक सहभागी होत असतात. एसपी नॉर्थ आणि जिल्हाधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. आम्ही पुढील ३ दिवसांसाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करत आहोत” असंही मुख्यमंत्री म्हणाले.