सोलापुरात गरोदर मातांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका

खेड्यापाड्यातील किंवा वस्त्यांवरील गरोदरमातांना घरापासून दवाखान्यापर्यंत नेण्याची सोय आरोग्य विभागाकडे आहे. त्यासाठी ‘१०२’ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास रूग्णवाहिकेमार्फत सेवा पुरविली जाते.त्यासाठी आरोग्य विभागाकडे १३० रुग्णवाहिका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गरोदर मातांना दरमहा दवाखान्यात जावे लागते. तसेच प्रसूती दरम्यान व प्रसूतिपश्चात वैद्यकीय चाचणीसाठी व उपचारासाठी गरोदरमातांना दवाखान्यात जाण्याची वेळ येते. प्रसूतीनंतर महिला किंवा नवजात शिशू आजारी पडल्यानंतरही उपचारासाठी दवाखान्यात जातात. पण, त्याठिकाणी वाहनांची पुरेशा प्रमाणात सोय उपलब्ध नाही, तासन्‌तास वाहनांची वाट पाहावी लागते. यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाने तशा महिलांसाठी मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित महिलेच्या कुटुंबातील कोणीही किंवा त्या महिलेने १०२ या क्रमांकावर कॉल केल्यास काही वेळातच त्याठिकाणी रुग्णवाहिका जाते. त्यानंतर त्या महिलेला दवाखान्यात पोच करण्याची जबाबदारी त्या रुग्णवाहिकेवर आहे. १०२ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून यंदा १३ हजार महिलांना मोफत सेवा मिळाली आहे.

महामार्गावर अपघात झाल्यास किंवा सर्पदंश अशा जीवघेण्या प्रसंगात त्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभागाकडे १०८ या रुग्णवाहिका आहेत. आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्त व्यक्तींना प्राथमिक उपचार देणे, त्याचा जीव वाचविणे, पुढील जोखीम कमी करण्यास मदत करणे, रुग्णांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत करण्याचे काम या रुग्णवाहिका पार पाडतात. जिल्ह्यातील कोणत्याही भागातील रुग्णाला २४ तास सेवा देणारी ही रुग्णसेवा खूप महत्त्वाची ठरत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने वाढलेला मृत्यूदर ‘१०८’मुळे कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडे वाढीव रुग्णवाहिका असाव्यात, यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची मागणी केली आहे. यावर्षी ५० लाखांचा निधी तर पुढच्या वर्षी दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. त्यातून जवळपास १५ रुग्णवाहिका आपल्याला मिळतील.