सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप सुरु करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी झाला. मात्र, काही साखर कारखान्यांनी उसाची बिले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली नाहीत.सोळा साखर कारखान्यांकडे ६०० कोटींची बिले थकल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाअभावी खरीप हातातून गेला असल्याने पीककर्जासह इतर देणी कशी परत फेड करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या गाळप हंगाम सुरु केले आहे. सोळा कारखान्यांनी २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप केले असून २३ लाख ५२ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.या कारखान्यांकडे सुमारे ६०० कोटीची रुपयांची ऊसबिले थकली आहेत. ऊस गाळपास गेल्यानंतर चौदा दिवसांत बिल जमा करणे बंधनकारक आहे, परंतु कारखान्यांनी ऊस दर नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.
खरिपासह ऊस लागवडींकरिता शेतकऱ्यांनी सहकारी बॅंक, सोसायटी, खासगी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. ऊस बिले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली नसल्याने कर्जाची परत फेड कशी करायची आणि येणाऱ्या उन्हाळी हंगामासाठी लागणारा पैसा कसा उभारायचा असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागला आहे.