थेट रामचरितमानसचा उल्लेख करत पाकिस्तानला इशारा

ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील माहिती देत भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणावग्रस्त वातावरणात सद्यस्थिती काय आहे याची माहिती देणारी लष्कराच्या तिन्ही दलांची संयुक्त पत्रकार परिषद सोमवारी (12 मे 2025) पार पडली. यावेळी सैन्यदल, नौदल आणि वायुदलाचे उत्तस्तरिय अधिकारी आणि भारताच्या डिजीएमओंचाही सहभाग पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या कुरापतींवर उजेड टाकताना भारतानं या हल्ल्यावर प्रतिहल्ला कसा केला आणि शत्रूपक्षाचे हल्ले कशा पद्धतीनं परतवून लावले याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लष्कराच्या या पत्रकार परिषदेदरम्यान अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनीधींनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिली. याचदरम्यान रामचरितमानस आणि रश्मिरथीतील काही ओळींचाही उल्लेख केला. मुळात युद्धनितीशी या ओळींचा असणारा संदर्भ इथं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं.

ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रिफिंगदरम्यान दिनकर यांच्या काही ओळींचा उल्लेख करण्यात आला होता. “जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है ” अशाच आशयाच्या त्या ओळी होत्या. वीर आणि रौद्र रसात लिहिण्यात आलेल्या या ओळखी कवीवर्य दिनकर यांच्या खंडकाव्य ‘रश्मिरथी’मध्ये तेव्हा लिहिण्यात आल्या आहेत जिथं श्रीकृष्ण शांतीदूत होऊन हस्तिनापुरी दाखल होतात आणि तिथं युद्ध कोणत्याही समस्येचा तोडगा नाही.. शांतीच सर्वतोपरि आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. कृष्ण इथं पांडवांसाठी फक्त दुर्योधनाकडून पाच गावं मागून उरलेला सर्व भूभाग त्याच्याकडेच ठेवण्याचा प्रस्ताव मांडतात.

कवितेच्या या अंशामध्ये सांगण्यात आलं आहे की, पांडवांनी कायमच अहिंसा आणि सहिष्णुतेच्या मार्गावरच राण्याचा पर्याय निवडला. हिंसा आणि नातलगांची हत्या करण्याच्या शक्यतेपासूनच दूर राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र जेव्हा सर्व प्रयत्न निकामी ठरले तेव्हा मात्र त्यांनी मोठ्या धाडसानं आणि चतुराईनं महायुद्ध लढत कौरवांचा पराभव केला. या ओळींचा गर्भीतार्थ पाहता पाकिस्तानसोबतच्या या तणावाचं कथन करण्यासाठी म्हणूनच त्यांची निवडच करण्यात आली.

रामचरितमानस आणि युद्धनीति

माध्यम प्रतिनिधींपैकी एकानं जेव्हा एअर मार्शल भारती यांना काव्यपंक्तीच्या निवडीविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, मी फक्त तुम्हाला राम चरितमानसच्या काही ओळींचं स्मरण करु देऊ इच्छितो, तुमच्या लगेचच लक्षात येईल. ती ओळ आठवून पाहा, ”विन. न मात जलधि जड, गए तीनि दिन बीति| बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति|”.

वरील ओळींचा उल्लेख केल्यानंतर त्या रामचरितमानसमधील असल्याचं सांगत त्यांनी या ओळींचा संदर्भसुद्धा दिला. या ओळी तेव्हाच्या आहेत जिथं प्रभू श्रीराम यांनी समुद्रदेवतेला वाट करून देण्यासाठीची विनंती केली. मात्र तीन- चार वेळा जेव्हा सागरानं त्यांची विनंती ऐकली नाही तेव्हा मात्र श्रीराम यांचा संताप अनावर झाला आणि ते म्हणाले आता भयाविना प्रिती नाहीत त्यामुळं हा इतकाच इशारा पुरेसा आहे असं म्हणत त्यांनी किमान शब्दांत थेट पाकिस्तानच्या कटकारस्थानांना इशारा दिला.

‘भय बिन होऊ न प्रीत’ या ओळीचा अर्थ, प्रेम किंवा सौहार्दाच्या अस्तित्वासाठी एका निवारक तत्त्वाची आवश्यकता असते. जेणेकरून प्रतिपक्ष तुम्हाला अपमानित करण्यापूर्वी किंवा अपमानित करताना दोनदा पुनर्विचार करेल. ज्या व्यक्तीची कोणालाही भीती नाही अशा सामान्य व्यक्तीला त्यांच्या नात्यांमध्ये प्रचंड आदर किंवा समान व्यवहाराची वागणूक मिळत नाही. पौराणिक काव्यांचा आधार घेत युद्धनितीशी त्याचा संबंध इथं भारतीय लष्करानं जोडत साऱ्या जगाचच लक्ष वेधलं असं म्हणणं गैर ठरणार नाही.