केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी तालुका प्रशासन व कृषी विभागाने एकत्रितपणे काम करावे तसेच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते कसे उपलब्ध होईल याबाबत ही नियोजन करण्याच्या सूचना आमदार अभिजीत पाटील यांनी दिल्या.
आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरात तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक सिंहगड कॉलेज, कोर्टी, पंढरपूर येथे संपन्न झाली. खरीप हंगामाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला पंढरपूर कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तहसीलदार सचिन लंगोटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून कृषीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचे सविस्तर प्रशिक्षण केव्हीके बारामती येथे घेण्याचे सांगितले. तसेच गावोगावी, वाडीवस्तीवर योजनांचे क्यूआर कोड बोर्ड लावावेत, जमीन सुपीकता बोर्ड लावण्याचे सांगितले. केंद्रातील योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी तालुका प्रशासन व कृषी विभागाने एकत्रितपणे काम करावे तसेच शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खत कसे उपलब्ध होईल याबाबत ही नियोजन करण्याच्या सूचना आमदार अभिजीत पाटील यांनी दिल्या. यावेळी ३१ वेगवेगळ्या मोहिमांची माहिती शेतकऱ्यांना देत तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत मोरे यांनी खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण केले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. यावेळी एमआरईजीएस फळबाग लागवड योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रगतशील शेतकरी धनराज खोत, आनंद ढवळे, सुहास यादव यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.