सांगोला तालुक्यात पशुखाद्य दरवाढीने दूध उत्पादक मेटाकुटीला! दूध उत्पादकांची नाराजी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात विशेषतः सांगोला व मंगळवेढा या भागात शेतीस जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाला पशुखाद्याच्या सततच्या वाढत्या दरामुळे नुकसान होत आहे. दुधाच्या पैशातून जनावरांना वैरण, पशुखाद्य व वेगवेगळे आजार यावर होणाऱ्या खर्चाचे गणित शेतकऱ्यांना जुळत नसल्याचे वास्तव आहे.त्यामुळे पशुखाद्याच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणत आहेत.

दुभत्या जनावरांसाठी सरकी पेंड, गोळी पेंड, मक्याचा भरडा, शेंग पेंड, गहू भुशी याबरोबरच वेगवेगळी सप्लिमेंट ठेवावी लागतात. शिवाय ओला व वाळलेला चारा समप्रमाणात ठेवल्यास गायीचे आरोग्य व्यवस्थित राहाते व दुधात सातत्य टिकते.

पण एवढे खाद्य देण्यासाठी गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर किमान ४० रुपये हवा, असे दूध उत्पादकांचे मत आहे. एका गायीसाठी दररोज दहा किलो पशुखाद्य ठेवावे लागते. प्रतिकिलो ४० रुपयेप्रमाणे ४०० रुपये होतात. एक सुदृढ गाय सरासरी १५ लिटर दूध देते. लिटरला २६ रुपयांप्रमाणे ३९० रुपये होतात.

चाऱ्याचा खर्च मिसळल्यास दूध उत्पादकांना दररोज १५० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. यात औषधांसाठीचा खर्च वेगळा असतो.बाजारात कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे पशुखाद्य दरातही वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी दरवाढ अपेक्षित आहे.

पशुखाद्याच्या दराचा विचार केल्यास दूध धंदा परवडत नाही. पण बाकी करायला काहीच पर्याय नसल्याने नाइलाजाने आम्हाला तोट्यात हा दुग्धव्यवसाय करावा लागत आहे. एक तर पशुखाद्याचा दर कमी व्हावा किंवा दुधाच्या दरात वाढ व्हावी अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून होत आहे.