ज्याच्या नावानं थरकाप उडायचा त्याच दरोडेखोराच्या नातवानं UPSC त मारली बाजी

स्पर्धा परिक्षा, त्यातही राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा युपीएससी परीक्षा आणि या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेणारी अनेक नावं समोर येतात. कैक दिवसांची मेहनत, पापणीही लवणार नाही इतक्या जिद्दीनं आणि एकाग्रतेनं केलेला अभ्यास आणि या- न त्या माध्यमातून आपल्याकडून होणारी देशसेवा असेच हेतू केंद्रस्थानी ठेवत आणि वाटेत येणारा प्रत्येक अडथळा ओलांडत काही मंडळी या युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि त्यांच्या यशापुढं सारंकाही फिकं पडलं. हे यशच सर्वतोपरी महत्त्व मिळवून जातं.

सध्या अशीच एक अनोखी यशोगाथा भविष्यात युपीएससीच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांसाठीसुद्धा प्रेरणास्त्रोत ठरत आहे. जिद्द आणि एकाग्रता असल्यास यश दूर नसतं हेच ही यशोगाथा सांगतेय आणि हे यश संपादन केलं आहे ग्वाल्हेरच्या देव तोमर यानं. खरंतर देव एक सामान्य परीक्षार्थी. मात्र त्यानं मिळवलेलं यश आणि त्याची कौटुंबीक पार्श्वभूमी पाहता, सध्या हे यश कौतुकास पात्र ठरत आहे हेच खरं.

देव तोमरचा जन्म ग्वाल्हेरमधील एका अशा कुटुंबात झाला होता, ज्याची कौटुंबीक पार्श्वभूमी कायमच चर्चेचा विषय ठरली. देवचे आजोबा कधीकाळी चंबल खोऱ्याच्या क्षेत्रातील कुख्यात डाकूंपैकी एक होते. आजोबांच्या या ओळखीमुळं देवला समाजात कायमच संशयी नजरांचा सामना करावा लागला. त्याच्यावर अनेकदा टीकासुद्धा झाली. ‘हा तर डाकू, दरोडेखोराचा नातू आहे हा कुठं काय करु शकणार ‘ असं म्हणत त्याला हिणवलं गेलं. मात्र या सर्व टीकांना त्यानं पाठीवर घेत भूतकाळाशी आपला काहीही संबंध नसल्याचच सिद्ध केलं आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केलं.

शैक्षणिक क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी करत देवनं अभ्यासाच्या बळावर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला. पुढे नेदरलँड्समधील फिलिप्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मुख्यालयात त्यानं संशोधक म्हणून काम केलं. इथं त्याला तब्बल 88 लाख रुपये इतका पगार मिळत होता. आवडीच्या क्षेत्रात इतका पगार मिळणं हे अनेकांचच स्वप्न होतं आणि देव ते स्वप्न प्रत्यक्षात जगत होता. पण, त्याचं आणखीही एक स्वप्न होतं, ज्यासाठी त्यानं मेहनत करत स्वत:ला झोकून देण्याचा निर्णय घेतला आणि कॉर्पोनेट नोकरीचा त्याग करून त्यानं देशसेवेचा मार्ग निवडला. अर्थात UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.

देवसाठी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यानं या परीक्षेसाठी 6 वेळा प्रयत्न केले. यापैकी 4 मुख्य परीक्षा तर 3 मुलाखत फेऱ्यांपर्यंत तो पोहोचला. मात्र तरीही त्याला अपयशाचाच सामना करावा लागला. देवनं त्याचा आत्मविश्वास अजिबातच गमावला नाही. अखेरच्या संधीमध्ये म्हणजेच 2025 च्या युपीएससी परीक्षेमध्ये देवनं देशभरातून 629 वा क्रमांक मिळवत हे यश अखेर खेचून आणलं.

देव तोमरची जिद्द अनेकांसाठीच आदर्श ठरक आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमची कौटुंबीक पार्श्वभूमी काहीही असो, तुमचं यश हा सर्वस्वी मेहनतीचाच भाग असतो आणि ही मेनहनत तुमची तुम्हीच करायची असते हेच देवनं त्याच्या या प्रयत्नांतून आणि यशातून दाखवून दिलं.