पी.बा.पाटील मळ्यात पुन्हा घरफोडी  चोरीच्या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण

इचलकरंजी, टाकवडे रोडवरील पी. बा. पाटील मळ्यात दोन आठवड्यांत तिसऱ्यांदा घरफोडीची घटना समोर आली आहे. आनंदा सूर्यवंशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. विशेष म्हणजे, गतवर्षी याच दिवशी याच घरात चोरी झाली होती. वर्षानंतर चोरट्यांनी पुन्हा हेच घर लक्ष केल्याने याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

 
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी कि, सूर्यवंशी कुटुंबीय चार दिवसांपासून गावी गेले आहे. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री शेजारच्या घराला बाहेरून कडी लावली आणि सूर्यवंशी यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूपही कडीतून तोडण्यात आले. घरात शिरल्यावर चोरट्यांनी थेट बेडरूम गाठली आणि तिथे असलेल्या दोन तिजोऱ्या उघडण्याचा प्रयत्न केला. तिजोरीतील लॉकरसाठी चाव्याही होत्या. त्यामुळे चोरट्यांना संधी मिळाली होती, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, त्यांनी तिजोऱ्या व घरातील वस्तूंची नासधूस केली.

 
शनिवारी सकाळी परिसरातील नागरिकांना घराचा गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ञ आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. श्वान मात्र घराच्या परिसरातच घुटमळत राहिला, त्यामुळे ठोस दिशा मिळाली नाही. या घरफोडीच्या घटनेमुळे मळे भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन आठवड्यांतील तीन घटनांमुळे चोरट्यांचे फावते आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.