कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. इतर दोन प्रवासी बचावले आहेत. जखमी तरुण रिक्षा चालक असून मयत महिला त्याची आई असल्याची माहिती आहे. जखमी तरुणाला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
गांधारी नदी पुलावर मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला. समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक देत डंपर थेट नदीत कोसळला. अग्निशमन विभागाकडून डंपर चालकाचा शोध सुरू आहे.
बापगाव येथून निलेश वानखेडे हा रिक्षचालक आपल्या आईला कल्याणला रिक्षाने घेऊन जात होता. यावेळी कल्याण गांधारी ब्रिजवर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा चालकाची आई मंगल वानखेडे, वय 55 वर्ष, यांचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक निलेश गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चक्काचूर झाला, तर डम्पर ब्रिजचे कठडे तोडून नदीत कोसळला. घटनास्थळी कल्याण खडकपाडा पोलीस दाखल झाले आहेत.
कसा झाला अपघात?
कल्याणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने बापगाव येथून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपर पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळला, तर रिक्षातून प्रवास करणाऱ्या मंगला वानखेडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षा चालक निलेश वानखेडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान नदीपात्रात कोसळलेल्या डंपर आणि चालकाचा शोध अग्निशमन विभागाने सुरू केला आहे.