सध्या महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. अनेक निर्णयांचा धडाका सुरु आहे. अनेक फेरबदल, तसेच अनेक योजना, विकासकामे यावर निर्णय सुरु आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. या नवीन जिल्हा निर्मितीमध्ये सहा तालुक्यांचा विटा हा सुवर्णनगरी जिल्हा करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.बाबासाहेब मुळीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अॅड. मुळीक म्हणाले, विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या सहा तालुक्यांच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी आणि त्यास सुवर्णनगरी हे नाव देण्यात यावे.
स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्याचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा समावेश होता. तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव ही संस्थाने होती. सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या सहा तालुक्यांचा नवीन जिल्हा करण्यात यावा. या जिल्ह्याचे केंद्र विटा हे ऐतिहासिक आणि मध्यवर्ती ठिकाण असावे.
विटा परिसरावर चालुक्यांचे राज्य होते. श्री. शां. भ. देव लिखित महाराष्ट्र गोवे शिलालेख या पुस्तकाच्या 613 क्रमांक पानावरील कानडी शिलालेखात संक्रांतीच्या मुहूर्तावर राजधानी भाळवणी येथील जैन विहाराला जमिनीचे दान दिल्याची नोंद आहे. यावरून या भागाची राजधानी भाळवणी येथे होती असे दिसते. सध्या विटा येथे खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव तालुक्यांसाठी अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायालय अस्तित्वात आहे.
तसेच वडूज येथे माण व खटाव तालुक्यासाठी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय अस्तित्वात आहे. त्याचबरोबर विटा, कडेगाव व वडूज येथे उपविभागीय अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत. संपूर्ण भारतासह नेपाळ, श्रीलंका या ठिकाणी कार्यरत असणारे गलाई व्यावसायिक हे खानापूर, आटपाडी, खटाव, माण, कडेगाव, पलूस या तालुक्यांतील आहेत. त्यामुळे या सहा तालुक्यांचा जिल्हा निर्माण करावा.