इचलकरंजी शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून लागल्याने बचाव करताना नंदिनी वाईंगडे ही दहावीची विद्यार्थीनी एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये १० ते १५ फुट खाली पडल्याने जखमी झाली. हा प्रकार मराठे मिल कॉर्नर परिसरात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या विरोधात ठोस मोहिम राबवावी अशी मागणी होत आहे.
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नंदिनी वाईंगडे ही विद्यार्थीनी सायकलवरुन ट्युशनसाठी जात होती. मराठे मिल कॉर्नर परिसरात अचानकपणे एक कुत्र्यांचे टोळके तिच्या मागे लागले. त्या कुत्र्यांपासून बचावासाठी ती मुलगी सायकल जोरात पळविण्याच्या प्रयत्नात परिसरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सायकलसह पडली. सुमारे दहा-पंधरा फुट खाली पडल्यामुळे ती जखमी झाली. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, क्लासेसला जाणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी, अन्य नागरिक, घराबाहेर, सोसायटी परिसरात खेळणारी मुले, पहाटे अथवा रात्री उशिरा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला करण्याचे प्रमाण पुन्हा वाढत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांची संख्या मोठी आहे. महानगरपालिका दरवर्षी केवळ काही कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करू शकते. कुत्र्यांच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात अपयश येत आहे. त्यामुळे अशा भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.