टेंभुर्णी शहर पुन्हा चोरट्यांच्या टार्गेटवर आले असून एकाच रात्रीत दोन बंद घराचे कुलूप तोडून किमती ऐवज चोरून नेला. यापैकी एका घरातील तब्बल २७ ग्रॅम सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.
याबाबत रमेश बंडू हवालदार (रा. सरकारी दवाखाना रोड टेंभुर्णी ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रमेश हवालदार हे पत्नी व मुलगा यांच्यासह शेतातील डाळिंब पिकाचे सरंक्षण करण्यासाठी गेले होते. त्यांची मुलगी हि भावाच्या घरी राहिली होती. ही संधी साधून चोरट्याने रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाट उघडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम सोन्याचे दागिने,१४ हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोन्याची फुले व झुबे ,सहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी,दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅम वजनाच्या व चार हजार रुपये किमतीच्या रिंगा, वीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेला.
दुसरी चोरी ही जवळची ब्राम्हण गल्ली भागात झाली असून बंद वाड्याचे कडी,कुलूप तोडून चोरीची घटना घडली. मात्र घरातील माणसे परगावी असल्याने चोरीचा तपशील कळू शकला नाही.
चोरीची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
