मुंबईकरांची दुहेरी कोंडी; रस्ते मार्गासह रेल्वे मार्गावरही खोळंबा, लाखो प्रवाशांचे हाल

मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. शहरात विक्रमी सरींनी हजेरी लावल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पावसामुळे हार्बर रेल्वे बंद पडली होती, तर पश्चिम रेल्वेवर फांद्या ओव्हरहेड वायरवर कोसळल्या. दिवसभर पडलेल्या पावसामुळे लोकलचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत कोलमडल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले.

रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे परिणाम सोमवारी सकाळी दिसू लागले. महामुंबईत धावणाऱ्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर पावसाचा परिणाम जाणवला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मशीद स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. मशीद स्थानकातील हार्बर मार्गावरील रुळांवर ९ इंच आणि जलद मार्गावरील रुळांवर ३ इंच पाण्याची पातळी वाढली. त्याचबरोबर सीएसएमटीतील फलाट क्रमांक ६/७ सह यार्डातील रेल्वे रूळही पाण्याखाली गेले, यामुळे सकाळी साडे दहा वाजल्यापासून हार्बर रेल्वे बंद झाली.

पश्चिम रेल्वेवर महालक्ष्मी आणि लोअर परळदरम्यान आणि चर्चगेट – मरिन लाइन्सदरम्यान झाडाच्या फांद्या ओव्हरहेड वायरवर कोसळल्या. त्यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या दोन घटना वगळता पश्चिम रेल्वेवर मोठ्या घटनेची नोंद झाली नाही. मात्र दिवसभर लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

पावसात लोकल सेवा सुरू आहे की बंद, याची माहिती नसल्याने प्रवासी स्थानकात खोळंबून राहतो. त्यामुळे प्रवाशांच्या त्रासात अधिक भर पडते, अशी प्रतिक्रिया प्रवासी ओम नार्वेकर यांनी व्यक्त केली. तर, आसनगावहून सकाळी १०.०३ सीएसएमटी लोकल कल्याणला आल्यानंतर ती रद्द करण्यात आली. कोणतीही सूचना न देता ती विशेष कसारा म्हणून चालवण्यात आली. यामुळे सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे प्रवासी नरेंद्र कदम यांनी नमूद केले.

मुंबईत सोमवारी मान्सूनचे दणक्यात आगमन झाले. विक्रमी नोंदीसह दाखल झालेल्या या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्यांची प्रचंड कोंडी झाली. लोकल अनिश्चित वेळेने धावत असल्याने प्रवाशांनी रस्ते मार्गे प्रवासाचा पर्याय निवडला. मात्र, जलमय रस्ते आणि वाहतूककोंडी यांमुळे त्यांचा खोळंबा झाला. एकूणच आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर निघालेल्या नोकरदारांची जोरदार पावसामुळे दुहेरी कोंडी झाली.

‘पूर्व आणि पश्चिम महामागांसह रस्ते मार्गावर प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला, गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अडीच तासांहून अधिक वेळ लागत होता. एरवी वाहतूककोंडीत सुमारे दीड तासांत हा प्रवास शक्य होतो’, अशी प्रतिक्रिया प्रवासी गणेश गांधार यांनी दिली. तर, बोरिवली ते वांद्रे या एका तासाच्या प्रवासाला पाऊस आणि कौडीमुळे दोन तास लागल्याचे प्रवासी हेमा साठे यांनी सांगितले.