तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा PF कापला जात असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. हो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता सेवा कालावधीत ओव्हरलॅप झाल्यास कर्मचाऱ्यांचे PF दावे नाकारले जाणार नाहीत. यामुळे, आता दावा निकाली काढण्यास आणि पैसे काढण्यासाठी HR विभागाकडून पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांची बचत सहजपणे काढता येऊ शकेल.
जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा जुन्या नियोक्त्याकडे असलेल्या त्याच्या EPF खात्यातील शिल्लक रक्कम नवीन नियोक्त्याच्या EPF खात्यात हस्तांतरित करू शकतो. या प्रक्रियेला हस्तांतरण दावा म्हणतात पण, बऱ्याच वेळा असं घडते की जुन्या आणि नवीन नियोक्त्याच्या सेवा तारखा एकमेकांशी जुळत नाही म्हणजे ओव्हरलॅप होतात, ज्यामुळे हस्तांतरणाचा दावा नाकारला जातो.
ईपीएफओने अलीकडेच एक सर्क्युलर जारी केले आणि स्पष्ट केले की सेवा कालावधी ओव्हरलॅपिंगच्या आधारावर प्रादेशिक कार्यालयाने PF दावा नाकारणे चुकीचे आहे. EPFO ने पुढे म्हटले आहे की अनेक खऱ्या कारणांमुळे ओव्हरलॅप होऊ शकतो, म्हणून दाव्याचे हस्तांतरण रोखण्यासाठी तो एक आधार मानले जाऊ नये.
उदाहरणार्थ जुन्या नियोक्त्याने कर्मचाऱ्याची शेवटची कामाची तारीख उशिरा नोंदवली किंवा नवीन नियोक्त्याने लवकर काम सुरू करण्याची तारीख दिली असेल तर, यामुळे कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी ओव्हरलॅप होऊ शकतो. कधीकधी EPFO डेटाबेसमध्ये चुकीचा डेटा प्रविष्ट केल्यामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते परिणामी, अनेक प्रादेशिक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांचे PF दावे नाकारले जातात आणि कर्मचाऱ्यांना त्रास होतो.
अशा परिस्थितीत, ईपीएफओने स्पष्ट केले आहे की आता केवळ दोन कंपन्यांच्या सेवा तारखांमध्ये ओव्हरलॅप असल्याने हस्तांतरण दावे नाकारले जाणार नाहीत. नवीन परिपत्रकानुसार, कोणत्याही हस्तांतरण दाव्यात ओव्हरलॅपिंग तारखा आढळल्या तर, संबंधित प्रादेशिक कार्यालयाने दावा नाकारू नये. अशा प्रकरणांमध्ये खरोखरच स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असेल तरच स्पष्टीकरण मागितले जाईल.
