त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का, यावर चर्चांना उधाण आले होते. हिंदी सक्तीविरोधातील निर्णय शासनाने मागे घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून 5 जुलै रोजी ‘विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा वरळी येथे होणार आहे. या मेळाव्यासाठी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, आता वंचित बहुजन आघाडी या विजयी मेळाव्याला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर काँग्रेसमध्ये देखील ऐनवेळी नाराजी पसरल्याची माहिती समोर आली आहे.
वंचित बहुजन आघाडी ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला अनुपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिली आहे. आमचा उद्याच्या मेळाव्याची काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरेंसोबतची ‘शिवशक्ती- भीमशक्ती’ युती तुटल्यानंतर अजूनही उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचे संकेत मिळत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती तुटल्याचे घोषणा केली होती. आता काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष ठाकरेंच्या विजयी जल्लोषाला अनुपस्थित राहणार असल्याने आता या मेळाव्याला कोणकोणत्या पक्षाचे नेते उपस्थित राहतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आयोजित केलेल्या ‘विजयी जल्लोष’ कार्यक्रमात काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंनी काँग्रेसला या कार्यक्रमासाठी अद्याप कोणतेही अधिकृत निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून कोणताही प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हिंदी भाषेवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे खाजगीत म्हणणे आहे. कारण, शिवसेना-मनसेच्या आधी काँग्रेसने हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली होती, मात्र आता संपूर्ण श्रेय अन्य पक्ष घेत असल्याची नाराजी काँग्रेस गोटात आहे. या पार्श्वभूमीवर, विजयी जल्लोषाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते गैरहजर राहणे हे राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरणार आहे.