महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्याच्या राजकारणाचा शाप आहे असं म्हटलं जातं. यामधून ठाकरे कुटुंबही सुटलेलं नाही. मध्यंतरी उद्धव ठकारेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा ‘संपलेला पक्ष’ आहे, असा उल्लेख केला होता. मात्र आता याच पक्षासोबत युती करण्यासाठी आदित्य ठाकरे उत्सुक असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच राज्यातील सर्वच पक्ष स्वबळाची चाचपणी करण्यासोबतच युती आणि आघाडीसंदर्भातील चाचपणी करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेली ठाकरे बंधू एकत्र येण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा चर्चेत असतानाच आदित्य ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याची इच्छा असल्याचं सूचित करणारं विधान केलं आहे. विशेष म्हणजे हे विधान करताना आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे जिथून खासदार आहेत त्या मतदारसंघातील एका आंदोलनाचा संदर्भ दिला आहे.
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी त्यांचा पक्ष आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं आहे, अशी आठवण करुन देत संभाव्य युतीसाठी उत्सुक असल्याचे संकेत दिलेत. डोंबिवलीमधील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं, असं सांगतानाच आदित्य यांनी हा युतीचाच एक भाग असल्याचं सूचित केलं आहे.
महाराष्ट्र हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे. मग ते कोणीही असू आम्ही त्यांना सोबत घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हटलं आहे. यावेळी त्यांनी डोंबिवलीमधील पलावा येथील पुलासाठी मनसे आणि शिवसेनेनं एकत्र आंदोलन केल्याची आठवणही करुन दिसली आहे. ठाकरे बंधुंनी एकमेकांना साद घातली होती. त्याचं पुढे काय झालं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरेंनी, “आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असेल तर आम्ही त्याला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढा देऊ,” असं म्हटलं.
“काल परवा तुम्ही पाहिलं असेल तर आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांचे (मनसेचे) राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलेलं आहे,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले. “आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रासाठी कोणताही पक्ष आणि कोणताही नेता आमच्याबरोबर येण्यास तयार असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन लढू,” असं आदित्य यांनी सांगितलं.
