गुन्ह्यांची तात्काळ निर्गत करण्यावर भर

इचलकरंजी, गुन्ह्यांची तात्काळ निर्गत  करण्यावर भर देणार असून इचलकरंजीतील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. त्याचबरोबर लवकरच एक व्यापक व्यासपीठ करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले.

जिल्हा पोलीस प्रमुख गुप्ता यांनी सोमवारी सायंकाळी शिवाजीनगर, गावभाग, शहापुर पोलीस ठाणे आणि वाहतुक नियंत्रण शाखेस भेट देऊन तेथील प्रत्येक विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ते करत असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. तसेच ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गांजासह अंमली पदार्थ सेवनामुळे युवा वर्ग  व्यसनाधिन होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री, वाहतुक आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आवश्यक कर्मचारी संख्या नियुक्तीबरोबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सुचना दिल्या आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्टेटस, प्रोफाईल ठेवत समाजात तेढ निर्माण करण्यासह दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर विशेष लक्ष आहे. याबाबत माहिती मिळाल्यास  कायदा हातात न घेता पोलिसांनी त्वरीत माहिती द्यावी. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्ह्याचा तांत्रिक तपास करण्यास मदत होत होती. मात्र, या बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांची महापालिकेच्या प्रस्तावित योजनेतून सुधारीत अत्याधुनिक रचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधिक्षक समिरसिंह साळवे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.