गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या उपचारपद्धतींमध्ये मोठी क्रांती झाली असून, त्या अधिक अचूक, रुग्ण-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित होत आहेत. भारतात स्तन, फुप्फुस आणि आतड्यांतील कर्करोगाच्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे, तसेच स्वादुपिंड (पॅन्क्रिया) आणि यकृत (लिव्हर) कर्करोगाच्या निदानातही अडचणी येत असून, अशा प्रकारांचे रुग्णही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन येथे ट्रू बीम टेकनॉलॉजी ही अत्याधुनिक रेडिएशन थेरपी प्रणाली आता उपलब्ध झाली आहे.
अमेरिकेतील व्हॅरियन मेडिकल सिस्टम्स कंपनीने विकसित केलेली ही प्रणाली कर्करोगावर अधिक अचूक, जलद आणि वेदनामुक्त उपचार देण्यासाठी ओळखली जाते. तिचा वापर केवळ कर्करोगग्रस्त भागावरच किरणोत्सर्ग केंद्रित करतो, त्यामुळे आसपासच्या निरोगी पेशींवर परिणाम कमी होतो.
ट्रू बीम टेकनॉलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरल्यामुळे रेडिएशन डोस अत्यंत अचूकपणे फक्त ट्युमरवर लागू होतो. यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात, तर इतर अवयवांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. फुप्फुस किंवा पोटातील ट्युमरसारख्या गाठी श्वासोच्छ्वासादरम्यान हलत असतानाही ट्रू बीम प्रणाली नेमकी लक्ष्य साधते. त्यामुळे उपचाराचा कालावधी कमी होतो आणि रुग्णाला होणाऱ्या वेदनांमध्ये मोठी घट होते.
बीमिंग होप या सहाय्यता गटाच्या सहकार्याने आतापर्यंत 25 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. उपचारादरम्यान शरीरावर व्रण राहत नाहीत आणि रुग्णाला उपचारादरम्यान अधिक आराम मिळतो. आरोग्यदायी ऊतींचा हानीकारक परिणाम टळतो, यामुळे उपचार अधिक सुरक्षित आणि रुग्णांसाठी सोपे होतात.
ट्रू बीम प्रणालीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती बहुतेक सर्व आरोग्य विमा योजनांद्वारे मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी आर्थिक आधारही मिळतो. सह्याद्री हॉस्पिटलने सुरू केलेली ही सेवा पुणेकरांसाठी आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाची ठरणार आहे. अत्याधुनिक ट्रू बीम टेकनॉलॉजीमुळे कर्करोगाविरोधातील लढाई अधिक प्रभावी, वेदनामुक्त आणि रुग्णांसाठी आशादायक बनणार आहे.
