भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविताना बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. यावेळी प्रवाशांनी भरलेली बस (Bus Accident) रस्त्याकडेला चरीत उलटली.ही घटना गळतगा-भीमापूरवाडी मार्गावर (Galataga-Bhimapurwadi Route) काल (बुधवार) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी असून बसमधील दोघांच्या छातीला जबर मार लागला आहे.
जखमींसह दुचाकीस्वाराला रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. केवळ दैव बलत्तर म्हणून बसमधील तब्बल ७३ प्रवासी बचावले आहेत. अपघाताची नोंद सदलगा पोलिसांत (Sadalga Police) झाली. अधिक माहिती अशी, निपाणी आगाराची बस इचलकरंजीहून निपाणीला ७३ प्रवासी घेऊन परतत होती. तर निपाणीकडून गळतगाकडे भरधाव दुचाकीवरून रमेश चव्हाण (मुळगाव हुपरी, सध्या रा. गळतगा) हा येत होता.
त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालक आर. ए. बंदी (रा. नवलीहाळ) यांचा वाहनावरील ताबा सुटून बस नाल्यात उलटली. यात दुचाकीस्वार चव्हाण याच्या डोक्याला मार बसला. गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील, संजय कागे, मिथुन पाटील, राजू उपाध्ये, बाबासाहेब पाटील, भरत नसलापुरे, बसवराज पाटील, राहुल वाकपट्टे, विजय तेलवेकर, संतोष हुनसे, राजू कमतनूरे, रवि शास्त्री, गिरीश पाटील, विनोद तेलवेकर आदींनी येऊन प्रवाशांना बसच्या बाहेर काढले.
एक महिला व पुरुष प्रवाशांच्या (दोघेही रा. इचलकरंजी) छातीला मार लागला. सदलगाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. यावेळी निपाणी आगाराचे व्यवस्थापक संगाप्पा बजान्नावर व रवी शास्त्री यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
बसमधील ७३ प्रवाशांपैकी बऱ्याच जणांना किरकोळ दुखापती झाल्याने त्यांनी गळतगा व निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच अपघात होऊनही कोणतीही जीवित हानी झाली नाही.