मैल मिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे पाण्याला उग्र वास येतो. असाच वास पंचगंगा नदीच्या पाण्याला येत आहे. कसबा बावड्यापासून ते रुकडी पर्यंतचे पात्र केंदाळाने व्यापलेले आहे. त्यामुळे पंचगंगा नदी काठावरील लोकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली नदीपात्राच्या दोन्ही बाजूला प्रचंड केंदाळ साचलेले आहे. तर काळेकुट्ट पाणी दिसत आहे. हेच पाणी पुढे रुकडी, साजणी, तिळवणी, माणगाव ते इचलकरंजी पर्यंत वाहत येऊ लागल्याने या गावातील नागरिकांना पंचगंगेचे दूषित पाणी प्यावे लागत आहे.
