पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता हा पूल खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिले. त्यानुसार विक्रोळी उड्डाणपूल (Vikhroli flyover) आज, शनिवारी सायंकाळी ४पासून वाहतुकीस खुला करण्यात येत आहे. या पुलामुळे पूर्व-पश्चिम बाजू जोडली जाणार असल्याने प्रवास वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधनात बचत होईल. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनधारकांनाही या पुलाचा उपयोग होणार आहे.
