टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध सलग आणि एकूण दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. विंडीजने भारताला 121 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 35.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. भारताने या विजयासह विंडीजला 2-0 अशा फरकाने व्हाईटवॉश केलं आहे. टीम इंडियाचा विंडीज विरुद्धचा सलग 10 वा तर शुबमन गिल याच्या नेतृत्वातील पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. तसेच टीम इंडियाने या विजयासह हेड कोच गौतम गंभीर याला बर्थडे गिफ्टही दिलं.
टीम इंडियाने चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत 121 धावांचा पाठलाग करताना 1 विकेट गमावून 63 रन्स केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. यशस्वी 8 धावा करुन मैदानाबाहेर परतला. तर केएल राहुल आणि साई सुदर्शन ही जोडी नाबाद परतली होती. त्यामुळे भारताला पाचव्या आणि अंतिम दिवशी आणखी 58 धावांची गरज होती. भारताने या धावा आणखी 2 विकेट्स गमावून पूर्ण केल्या.
साई सुदर्शन याने 76 बॉलमध्ये 5 फोरसह 39 रन्स केल्या. तर कॅप्टन शुबमन गिल 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या जोडीने भारताला विजयापर्यंत पोहचवलं. ध्रुवने नाबाद 6 धावा केल्या. तर केएल राहुल याने भारताच्या विजयात दुसऱ्या डावात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. केएलने 108 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली.
