मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात घुमणार कोल्हापूरच्या शाहिराचा आवाज!

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर मध्ये दसरा चौकामध्ये दीड महिना ठिया आंदोलन केले गेले. या आंदोलनावेळी कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांनी आपल्या शाहिरीद्वारे आंदोलनाची धग पेटती ठेवली.

आता 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील मुंबईत आरक्षणाचा एल्गार करणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचे दिलीप सावंत यांच्या शाहिरीचा आवाज मुंबईत घुमणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने सुमारे दीड महिना आंदोलन करण्यात आलं.

आता यापुढे २० जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. आंतरवाली सराटी येथून पुणे आणि तिथून पायी मुंबई पर्यंतचा प्रवास करण्यासाठी गावोगावातून अनेक मराठा कार्यकर्ते त्यांना जोडणार आहेत. अशा वेळी कोल्हापुरातून शाहीर दिलीप सावंत दररोज शाहिरी पोवाडे सादर करून त्यांना पाठबळ देणार आहेत.

एकूणच मराठा आंदोलनाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या शाहिराचा आवाज आता मुंबईत घुमणार आहे.