गळीत हंगाम अर्ध्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील ऊसदरावर (Sugarcane Rate) अखेर काल (बुधवार) तोडगा निघाला. पहिली उचल ३ हजार १७५ रुपये एकरकमी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाला.स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांनी (Sugar Factory) त्याला मान्यता दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सध्या जिल्हाधिकारी पदभार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. क्रांती साखर कारखान्याचे नेते, आमदार अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्यासह साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते.
अडीच तास बैठक चालली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ डिसेंबरला झालेल्या बैठकीत साडेबारा टक्के साखर उतारा असलेल्या कारखान्यांनी पहिली उचल ३२५० रुपये, १० टक्क्यांच्या पुढील कारखान्यांनी ३२०० रुपये, तर दुष्काळी आणि आजारी कारखान्यांनी ३१०० रुपये पहिली उचल द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) त्यावर ठाम होते.
कोल्हापूरप्रमाणे एफआरपी अधिक शंभर रुपयांचा मुद्दे मागे सोडून चर्चा सुरू झाली. सरसकट कारखान्यांनी पहिली उचल ३१७५ रुपये एकरकमी देण्याचे मान्य केले. मुख्य कार्यकारी अधिकारी धोसमिसे म्हणाल्या, ”ऊसदराबाबत दोन्ही गटांनी सामंजस्य दाखवले. सात कारखान्यांच्या दराबाबत चर्चा झाली.
कारखानदारांनी पहिली उचल एकरकमी ३१७५ रुपये देण्याचे मान्य केले आहे.”राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे साखराळे, वाटेगाव आणि कारंदवाडी युनिट तसेच क्रांती, सोनहिरा, विश्वास, हुतात्मा साखर कारखान्यांच्या दरांबाबत हा तोडगा काढण्यात आला. शेतकरी संघटनेचे संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, संदीप पाटील, दीपक मगदूम आदींची उपस्थिती होती.