ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejashwi Ghosalkar) यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेत दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. या अनुषंगाने पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. मात्र, आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार असल्याचा त्यांनी स्पष्ट केलं आणि दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.
भाजप नेते आणि मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांची बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची आणखी चर्चा रंगली आहे. तेजस्वी घोसाळकर यांचे दिवंगत पती, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यांच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या दुःखद मृत्यूनंतर, मंडळाला बदली नियुक्त करण्याचा अधिकार होता. सद्भावना म्हणून, तेजस्वी घोसाळकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आणि बँकेच्या नियमांनुसार असल्याचेही दरेकर म्हणाले.
काही दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांच्या नाराजीबाबत चर्चा केली होती, त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलं, त्याचबरोबर नाराजी संपल्याचंही जाहीर केलं. मी पक्षात नाराज होते, पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत, असे तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे.
