बालकांवरील अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे संकटसमयी बालकांना मदत मिळावी तसेच मानसिकदृष्ट्या खचलेल्या बालकांना तात्काळ समुपदेशन मिळावे यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांत हेल्पलाइनचा (Helpline) समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना थेट समुपदेशकांशी संवाद साधता येणार आहे.
अनेकदा शोषणाला बळी पडलेली मुले भीती, संकोच किंवा अनभिज्ञतेमुळे अन्यायाची माहिती पालक आणि शिक्षकांनाही सांगत नाहीत. अनेकदा याचा परिणाम बालकांच्या मानसिक आरोग्यावर होतो. बालकांना संकट ओळखता यावे आणि त्या परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायला शिकता यावे तसेच शाळांमध्ये सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अद्यापही अनेक मुलांना चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती झालेली नाही. अन्यायग्रस्त मुलांना वेळीच मदत व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्य महामंडळाच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांत चाइल्ड लाइनचा हेल्पलाइन क्रमांकाचा समावेश केला आहे. पाठ्यपुस्तकांत अखेरच्या पानाच्या आतील भागात हेल्पलाइनचा उल्लेख करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी १०९८ या चाइल्ड हेल्पलाइन नंबरवर कॉल केला तर प्रशिक्षित समुपदेशक संबंधित बालकाशी संवाद साधतो. या कॉलदरम्यान बालकाची माहिती गोपनीय ठेवली जाते. तातडीने मदतीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क केला जातो. गरजेनुसार पोलिस, बालकल्याण समिती किंवा सामाजिक कार्यकर्ते मदतीला जातात. भीती न ठेवता मदतीसाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार अशा सर्व गोष्टीसाठी हा नंबर उपलब्ध आहे.