पंढरपूर, आषाढी यात्रा सोहळा दिनांक ६ जुलै रोजी असून, यात्रा कालावधी २६ जून ते १० जुलै असा आहे या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना मंदिर समिती मार्फत देण्यात येणा-या सोई सुविधांची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात (Final Stages) आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली.आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. यात्रेला येणा-या भाविकांना चांगल्या व पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा घेण्यात आला.
आषाढी वारींच्या अनुषंगाने पदस्पदर्शनरांगेत अत्याधुनिक पध्दतीची १२ पत्राशेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दर्शनरांगेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप पासून कासार घाट पर्यंत २२० मीटर लांबीचा स्कायवॉक, स्कायवॉक ते पत्राशेड पर्यंत वासे व बांबुचे बॅरीकेटींग करून, वॉटरप्रुट मंडप उभारणे, पत्राशेड पासून गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजपर्यंत बॅरीकेटींग, दर्शनरांगेत बसण्यासाठी बाकडे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ६ ठिकाणी उड्डाणपुले, ३ ठिकाणी विश्रांती कक्ष, यंदा प्रथमच दर्शनरांगेत पाणी वाटपाच्या स्टॉलसोबत फिरते गाडे ठेवण्यात आले आहेत. तसेच मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल बसविण्यात येणार आहे. याशिवाय, स्वयंसेवी संस्था, उपजिल्हा रूग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे, यात्रेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पूर्व तयारी झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले.
सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, अॅड. माधवीताई निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक मनो श्रोत्री, लेखा अधिकारी व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.