हवमान खात्याने पुढील 24 तासांसाठी या चार जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे. चार जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये देखील पावसाने हाहाकार माजवला आहे. पालघर, वलसाड, नवसारी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) दिलाय.
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. ज्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्राला देखील अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पावसाचा धोका आहे. 24 तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर इतर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामध्ये कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काही भागात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
