बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. विद्या बालनने चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले. तिने अनेक अडचणींवर मात केली. आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विद्या बालनने सुरुवातीला टीव्हीवर काम केले होते. ‘हम पांच’ या मालिकेत ती अशोक सराफ यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. पण तिला लगेच यश मिळाले नाही. अनेक चित्रपटांमध्ये तिला नकाराचा सामना करावा लागला.
पण तरी विद्याने हार मानली नाही. तिने प्रयत्न सुरू ठेवले. 2005 मध्ये ‘परिणीता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विद्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट तिच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. आता विद्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करण्यास सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन मराठीत काम करणार असल्याची हिंट दिली होती. तिने एक मजेशीर रीलही शेअर केलेली. तेव्हापासून विद्या कोणत्या मराठी सिनेमात पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू झाली.
आता या गोष्टीवरचा पडदा बाजूला झाला आहे. विद्या कोणत्या मराठी सिनेमातून नव्हे तर चक्क मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजपासून झी मराठीवर सुरू होणाऱ्या कमळी या मालिकेतून विद्या प्रेक्षकांना भेटायला येतेय. या मालिकेत ती कमळीच्या शिक्षिकेची भूमिका साकारणार आहे. यासंबंधीत व्हिडिओ झी मराठीने नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये विद्या कमळीला शिकवताना दिसतेय. दोघींमध्ये मराठीतल्या म्हणींची चुरस चालू आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काहींनी विद्याच्या मराठीचे कौतुकही केले आहे. झी मराठीवरील कमळी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चांदुलीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली विजया बाबर यात मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
