आपल्या देशातील सुमारे ६५ टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड (Cultivation) करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नासिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. महाराष्ट्रात भात हे पीक “साळ” आणि “धान” या नावाने देखील ओळखले जाते.
हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ, शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब इत्यादी बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे. तसेच संकरीत भात निर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. आपल्या राज्यातील खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते.
भाताच्या सुधारित जाती
आपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवात ही सन १९६४ मध्ये तायचुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. – ८ ही भात जातींची लागवडीद्वारे झाली. त्यांनतर सन १९६७ पासून आपल्या देशातील शास्त्रज्ञांना जया, रत्ना यासारख्या अनेक बुटक्या. न लोळणाऱ्या तसेच रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या, लवकर तयार होणार्या, किडींना व रोगांना कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या भात जातींची निर्मिती करण्यामध्ये यश मिळाले. शेतकरीदेखील या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशातील व राज्यातील भात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. महाराष्ट्रात सन १९९१ पासून भात पिकावरील संशोधनास सुरुवात झाली.
भाताचे वाण
अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींची वैशिष्ठये या जाती कमी उंचीच्या, न लोळणाऱ्या व नत्र खतास उत्तम प्रतिसाद देणाऱ्या आहेत.
पाने जड, रुंद व उभात आणि गर्द हिरव्या रंगाची असल्याने कर्बग्रहण कार्य अधिक प्रभावीपणे होते. तसेच शेंडे, पान व त्याखालील पाने दीर्घकाळापर्यंत हिरवी व कार्यक्षम राहतात. त्यामुळे पानातील लोंबीत पळीजांचे प्रमाण कमी राहते.
या जाती इंडिका प्रकारातील असल्यामुळे दाणा पांढरा असून, शिजविल्यावर चिकट होत नाही. भात भरडल्यानंतर भाताचे शेकडा प्रमाण स्थानिक जातीपेक्षा जास्त असते. तांदूळ जाडा भरडा असून त्यांत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
चुडांना जास्त प्रमाणात फुटवे येतात. त्यातील बहुतेक फुटवे कमी कालावधीत निसवतात म्हणजे प्रथम व नंतर येणाऱ्या फुटव्यांच्या फुलोऱ्यातील अंतर कमी असते. त्यामुळे मुख्य आणि इतर फुटव्यांच्या लोंबीतील दाण्यांच्या संख्येत कमी तफावत राहते. पीक तयार झाल्यावर दाणे शेतात गालात नाहीत.
दिवसमानातील सुर्यप्रकाशाच्या कालावधीमधील फरकास कमी प्रमाणात संवेदनशील परंतु तापामानातील फरकास विशेष संवेदनशील असतात. त्यामुळे एकाच हंगामात पीक तयार होण्यास वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक दिवस लागतात. तसेच उन्हाळी हंगामात पीक तयार होण्यास सुमारे १५ ते २० दिवस अधिक लागतात.
या जातीत शोषण केलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षमपणे वापर केलेला दिसून येतो. त्यामुळे पिकाची फाजील वाढ न होता खताच्या प्रमाणात दाण्याचे उत्पादन वाढते.
या जाती महत्वाच्या रोग व किडीस काही प्रमाणात प्रतिकारक आहेत.
जमीन व हवामान
भात हे उष्ण कटीबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. पोयता व चिकणमातीयुक्त पोयता त्याचप्रमाणे जमिनीचा सामू (पी. एच.) ५ ते ८ या दरम्यान असल्यास पिकापासून अधिक उत्पादन मिळते.
बियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया
अधिक उत्पादनासाठी योग्य सुधारित जातीचे प्रमाणित बियाणे वापरणे आवश्यक आहे, तसेच ते दर तीन वर्षांनी बदलाने आवश्यक आहे. प्रमाणित बियाणे उपलब्ध न झाल्यास बियाण्याची पेरणीपूर्व प्रक्रिया करणे अत्यंत जरुरीचे आहे. कारण अधिक उत्पादनासाठी निरोगी आणि वजनदार भाताचे बियाणे वापरावे. त्यासाठी ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे. पेरणीपूर्वी बियाणे या द्रावणात ओतावे. नंतर द्रावण ढवळून स्थिर होऊ द्यावे. पोकळ व रोगाने हलके झालेले, तरंगणारे बियाणे काढून टाकावे. तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत 24 तास वाळवावे. नंतर रोगप्रतिबंधक उपाय म्हणून १ टक्का पारायुक्त औषध उदा. थायरम, मोन्सन १ किलो बियाण्यास २.५ ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
भातावर आभासमय काजळी पडलेल्या लोंब्या वेचून रोगग्रस्त दाणे जाळून टाकावेत. ज्या ठिकाणी ‘उदबत्या’ रोगाचा प्रादुर्भाव होतो अशा ठिकाणी बियाणे ५० से. ग्रे. अंश तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून नंतर ते चांगले सुकवून पेरणीसाठी वापरावे.
पोषक घटक
हवामानाच्या विविध स्थितींमध्येही कीड टिकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा. नायट्रोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये सिलिकाचा अभाव, कमी तापमान व अधिक आर्द्रता असलेली थंड कोरडी हवा, पूर्वीच्या पिकाचे अवशेष शेतात शिल्लक असणे इ.
व्यवस्थापनात्मक उपाय
किडीच्या बंदोबस्तासाठीच्या एकात्मिक उपायांमध्ये संवर्धनात्मक (कल्चरल), जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) तसेच वर्तनात्मक (बिहेवियरल) दृष्टीने विचार करता येतो, तो असा –
(हवामानानुसार) लवकर तयार होणार्या व चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करणे
जमिनीचा pH ७ पेक्षा जास्त असल्यास, दर एकरी 2.5 किलो स्यूडोमोना फ्लुरोसंस/ PGPR कंसोर्टियाचा, 25 किलो कडुनिंब-पेंड आणि 250 किलो चांगल्या कुजलेल्या खतासहित, वापर करणे. तसेच, अखेरच्या नांगरटीनंतर जमिनीचा pH ७ पेक्षा कमी असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडचा वापर करणे.
बियाण्यावर प्रक्रिया करणे – प्रत्येकी एक किलो बियाण्यावर १० ग्रॅम ह्याप्रमाणात स्यूडोमोना फ्लुरोसंस/ पीजीपीआर कंसोर्टियाची प्रक्रिया करणे / एक हेक्टर जमिनीवर लावता येतील इतकी रोपे 2.5 किलो कंसोर्टिया पी फ्लुरोसंसमध्ये बुडवणे.
रोपांची पुर्न पेरणी करण्याआधी त्यांवरील खोडकिड्याची अंडी काढून टाकणे
पिकाच्या वाढीतील किडीला बळी पडण्याच्या नाजूक दिवसांमध्ये शेताची नीट पाहणी करून डेड हार्ट्स तसेच व्हाइट हेड्सचा छडा लावणे.
रोपांची पुर्नपेरणी केल्यानंतर २८ दिवसांनी, एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा, अंडी खाणार्या ट्रायकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करणे. तसेच ह्या पुर्नपेरणी नंतर ३७, ४४ व ५१ दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोनिक्सचा वापर करणे.
