हिमाचल (Himachal) प्रदेशमध्ये ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असल्यामुळे पर्यटनासाठी फिरण्यास गेलेले महाराष्ट्रातील काही पर्यटक या पूर परिस्थितीमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येत असून यामध्ये काही पर्यटक सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अजूनही प्रशासनाकडून कोणताही या घटनेला दुजोरा दिला नसून यामधून कोणतीही पर्यटकांची अद्याप आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सोमवारी (30 जून) हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे काही इमारती कोसळल्या असून अनेक भागात भूस्खलन झाले आणि रस्ते बंद झालेत. अशातच, पावसाळ्यापासून आतापर्यंत राज्यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी सकाळी हिमाचलच्या मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्गावरील थलौतच्या भुभू जोत बोगद्याजवळ भूस्खलन झाले. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक वाहने बोगद्यातही अडकली आहेत. सतर्कतेमुळे आज हिमाचलच्या 4 जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत.
