हुपरीत उद्या स्व. आप्पासाहेब बळवंत नाईक व एल. वाय. पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!


हुपरी परिसरातील सहकार, शेती व शिक्षण तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व संस्थापक स्व. आप्पासाहेब बळवंत नाईक व एल. वाय. पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते हुपरी पैसा फंड बँकेचे श्री पैसाफंड आप्पासाहेब नाईक (दादा) शेतकी सहकारी बँक लि. असा नामविस्ताराचा सोहळा होणार असल्याची माहिती अध्यक्ष आण्णासाहेब भोजे यांनी आयोजित बैठकीत दिली.

हा कार्यक्रम शनिवार ता. ३० डिसेंबर रोजी यशवंत मंगल कार्यालय यशवंत नगर हुपरी येथे सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली, आम. प्रकाश आवाडे, आम. राजूबाबा आवळे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित होत आहे.

यावेळी शेतकरी मेळावा, पिक प्रदर्शन व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच सिल्व्हर बॉईज हुपरी यांच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली. यामध्ये रामगोंडा भोजकर सरस्वती ग्रामीण बिगरशेती पतसंस्था (आदर्श संस्था),रोटरी क्लब ऑफ हुपरी (आदर्श समाजसेवी संस्था ), सागर आप्पासो माळी (आदर्श शेतकरी), अरविंद पांडुरंग पारगावे (आदर्श उद्योजक), राजेंद्र अशोकराव आलोणे (आदर्श शिक्षक ), उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सिध्दीविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल टाकाळा कोल्हापूर आदींचा यामध्ये समावेश आहे. या बैठकीत उपाध्यक्ष शामराव गायकवाड, संचालक श्रीकांत नाईक, प्रकाश जाधव, शितलकुमार पाटील, मॅनेजर बाळासाहेब येळवडे, असिस्टंट मॅनेजर गजानन माळी शेतकी अधिकारी शिरीष आवटे, पीआरओ शिवाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.