छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक किल्ल्यांना ‘ जागतिक वारसा स्थळ ’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यानंतर सर्वच स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. अनेक कलाकारांनी देखील हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलंय. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देखील यासदंर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडू मधील १ किल्ला (Fort) असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यापुढे हे समाविष्ट झालेले किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी हे आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणार आहेत. सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद !
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाल्यानं शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळालं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजतापासून लाइव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून ही माहिती भारतीयांपर्यंत पोहोचली. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला.
युनेस्कोच्या मानांकनासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयामार्फत २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या पाचपैकी महाराष्ट्राचा हा ‘मराठा लष्करी स्थापत्य’ हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोकडं पाठविण्यासाठी निवडला होता. या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉ. शिखा जैन आणि पुरातत्त्व संचालक डॉ. तेजस गर्गे यांचं योगदान महत्त्वाचं होतं. युनेस्कोच्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२४मध्ये आयसीओएमओएस तज्ज्ञ ह्वाजोंग ली यांनी या बारा किल्ल्यांची स्थळ भेट दिली.
