रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून तब्बल 24 लाखांची फसवणूक

रेल्वे (Railway) खात्यात नोकरी लावतो म्हणून नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशी सर्व प्रक्रिया पार पडल्याचे भासवत परळी येथील 21 वर्षीय महादेव भरत मुंडे या युवकाची तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संभाजीनगर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, महादेव मुंडे यांचे शिक्षण सुरू असून ते कुटुंबासमवेत पंचशीलनगर, परळी येथे राहतात.

नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्या वडिलांचे ओळखीचे असलेले काशीनाथ भानुदास घुगे (रा. शिवाजीनगर, परळी) यांनी त्याला रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे सांगून विश्वासात घेतले, 5 डिसेंबर 2023 रोजी ते महादेवला दिल्लीला घेऊन गेले व तेथे त्याचे मेडिकल करण्यात आले. यानंतर, सचिन नारायण वंजारे (रा. परळी) यांच्या खात्यावर दोन दिवसात एकूण 1 लाख रुपये पाठविण्यात आले. त्याच्या मोबदल्यात महादेवला रेल्वेच्या गेटमन पदाचे बनावट नियुक्तीपत्र दिले गेले.

पुढे अमृतसर येथे जाऊन ट्रेनिंगची प्रक्रिया सुरू झाली. परंतु नंतर, रेल्वे क्वार्टर मिळवण्यासाठी आणखी 3 लाख रुपये मागण्यात आले. महादेवच्या वडिलांनी आपल्या खात्यातून 90 हजार रुपये काशीनाथ यांना पाठवले. अमृतसर येथे सुरजसिंह नावाच्या इसमाशी संपर्क करून गेट क्र. 26 वर ट्रेनिंग सुरू झाली. पुढील टप्प्यात महादेवकडून संजय ठाकूर, मनिष यादव, एस. के. सिंग या व्यक्तींनी वेळोवेळी संपर्क करून 50 हजार ते 6 लाखांपर्यंतची रक्कम मागून घेतली. या शिवाय, महादेवच्या मामाकडून आणि आजोबांकडून त्याच्या चुलत मामासाठी “टीसी” पदावर नोकरी लावण्यासाठी तब्बल 14,70,000 रुपये उकळण्यात आले.

यातून काही रक्कम स्वतः महादेवच्या खात्यातून व वडिलांच्या खात्यातून प्रेमकुमार यांच्या खात्यावर पाठवली. अशी तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. महादेवचे चुलत मामा दिल्लीतून मिळालेली नियुक्तीपत्र घेऊन मुंबई CSTM येथे DMR ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठी गेले. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी ही ऑर्डर बनावट असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्व प्रकाराची पोलखोल झाली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्काच बसला.

या सर्व प्रकारानंतर महादेव मुंडे यांनी संभाजीनगर, परळी वै. पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे हे करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.