दुष्काळी जनता नागनाथअण्णांची सदैव ऋणी

आटपाडी, दुष्काळग्रस्त भागात पाणी चळवळ उभी करून तेरा तालुक्यांना नवसंजीवनी देणारे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे जनतेचे खरे कैवारी होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे आटपाडीसह तेरा तालुक्यांना पाणी मिळाले. त्यामुळे दुष्काळी जनता नागनाथअण्णांची सदैव ऋणी राहील, असे गौरवोदगार जेष्ठ नेते आनंदराव पाटील यांनी काढले.

भिंगेवाडी येथे नागनाथ अण्णांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते नागनाथ अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी स्वाभिमानी आघाडीचे नेते भारत पाटील, प्रा.अशोक पाटील , अशोक लवटे,फिरोज खाटीक,जितेंद्र जाधव,वसंतराव पाटील, सुखदेव कटरे, मोहन गेळे,आशा कदम, आरती सुरवसे , रवींद्र लांडगे उपस्थित होते. आनंदराव पाटील म्हणाले, नागनाथ अण्णांनी दुष्काळी भागातील जनतेला लढायचे बळ दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळे चार -पाणीटंचाईची समस्या दूर झाली. आज शेतकऱ्यांना पाणी मिळत असले तरी शेवटच्या घटकापर्यंत ते पोहचले पाहिजे. त्यासाठी आजही जागरूकतेने काम करण्याची गरज आहे.

भारत पाटील म्हणाले, अण्णांनी तन,मन,आणि धन अर्पण करत पाणी परिषदेची चळवळ उभारली. हुतात्मा कारखान्याने परिषदेचा खर्च उचलत दाखवलेली दानत ही लाखमोलाची होती. हि देणगी दुष्काळी जनता कधीच विसरणार नाही.