‘ट्रेनी आयपीएस अधिकाऱ्यांचा जुगार अड्ड्यावर छापा’; लाखाेंची रोकड, २५ वाहने जप्त; साेलापूर जिल्ह्यात खळबळ..

सांगोला तालुक्यातील कोळा येथील जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी आयपीएस प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वातील पथकाने रविवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास छापा टाकला. यात जुगार खेळणाऱ्या ३३ जणांना ताब्यात घेतले आहे.

सुमारे पाच लाखांवर रोकड व २५ वाहने जप्त केली आहेत. पोलिसांना पाहताच तिघेजण पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

ग्रामीण पोलिस दलातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून कोळा गावातील महावितरणच्या कार्यालयामागील एका शेतातील घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या नेतृत्वातील पथक तेथे पोचले. पाच अधिकारी व २५ अंमलदारांच्या पथकाने तेथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी ११ चारचाकी वाहने, १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

पळून गेलेल्या तिघांच्या वाहनांवरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. कारवाईच्या ठिकाणावरून अंदाजे पाच लाखांवर रोकड जप्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांमार्फत सुरू होते. जुगार खेळणाऱ्या ३६ जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लागू शकते. दरम्यान, कोळा येथील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री. डगळे यांनी स्थानिक पोलिसांशिवाय त्यांच्या ३० जणांच्या पथकासह ही कारवाई केली आहे. कारवाईनंतर सांगोला स्थानिक पोलिसांना छापा टाकल्यासंदर्भात समजले. श्री. डगळे यांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे सांगोला तालुक्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

अडीच महिन्यांतील दुसरी मोठी कारवाई

पंढरपूर विभागातील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्यातील सोनंद येथे जुगार अड्ड्यावर अशीच कारवाई केली होती. त्यावेळी दोन कोटी ६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईत ५० जणांना ताब्यात घेतले होते.