पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांना अटक

पुण्यातील खराडी भागातील उच्चभ्रू सोसायटीत सुरु असणा रेव्ह पार्टीवर मारलेल्या पोलिसांच्या छापेमारीत रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. हाऊस पार्टीच्या नावाखाली या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, हुक्का, दारूचे सेवन सुरु होते. यात सोसायटीतील एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरसह 3 महिला आणि दोन पुरुषांचाही सहभाग होता. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पहिली प्रतिक्रीया आली आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे आक्रमकपणे सरकारवर टीका करताना, विषय मांडताना दिसून येत आहेत. सरकारविरोधात सध्या कोणीही बोलताना दिसला तर त्याला दाबण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याची नवी पध्दत सुरु झालीय. जे विरोधात बोलतात त्यांना थेट काही करता येत नाही त्यामुळं कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा’ आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सांगितलं.

‘या घटनेविषयी मला फारसं माहित नाहीय. यात सत्य काय आहे हे पोलीस तपासात निश्पन्न होईल. मला यात आता एक राजकीय अँगल असा दिसतोय की कोणीही आता सत्ताधाऱ्यांविषयी बोललं की त्यांना नाही पण त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याची जी पद्धत सुरु झाली आहे, हा मला त्यातलाच प्रकार वाटतोय. त्यामुळे जे काही चाललंय, जे गुन्हे चालुयेत,जे हुंडा बळी सुरुयेत.यावर काही कारवाई होताना दिसत नाहीय. पण जे विरोधात बोलतायत, म्हणजे जर रोहिणी ताई खडसे जर विरोधात बोलतायत ना तर त्यांचं तोंड कसं बंद करता येईल. त्यांचे मुलं तर लहान आहेत. मग नवऱ्याला पकडता येईल का? अशा प्रकारे टार्गेट केलं जातंय. जर पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरु असेल तर इतर ठिकाणी अशा बाबतीत ज्याप्रकारे पाहिलं जातं तसंच इथंही पाहिलं पाहिजे. जर कोणी एखादा फ्लॅट बुक करून अशा प्रकारे दारू पित असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्याला सामोरे जायला सगळे तयारच असतात.’ या सगळ्या प्रकाराला निश्चितीच राजकीय वास आहे यालाही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दुजोरा दिला.

एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत आहेत. त्यामुळे सध्या बोलायला नकार दिला आहे.