मुंबई आणि पुणे (Pune) या दोन्ही महानगरांना पावसाने झोडपून काढले आहे. सलग दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या पुणेकरांना टॅफिकमध्ये अडकून पडावे लागले आहे.
आज सकाळपासूनच सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून विठ्ठलवाडी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तसंच, सततच्या पावसामुळं रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळं वाहनांचा स्पीड कमी झाला आहे. याच्याच मुळं वाहतूक कोंडी झाली आहे.सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे अद्याप लोकार्पण झाले नसल्यामुळं वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसंच, पावसाचा फटकादेखील बसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. पडणाऱ्या पावसाचा जोर जास्त नसला तरी सलग दुसऱ्या दिवस सातत्याने सुरू असलेल्या संततधारेमुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. दरम्यान 14 धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीकाठच्या रहिवाशांना महापालिका प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्टनंतर पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने विशेष पथके नेमली आहेत. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन पथके कार्यरत आहेत. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात आता 92 टक्के पाणीसाठा जमा झालाय. चारही धरणांच्या पाणलोट क्षेञात दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने धरणातला येवा वाढून पाणीसाठी 26 टिएमसीच्या पुढे गेलाय.
