उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले मातोश्रीवर !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय जवळीकीची चर्चा 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा विषय ठरली आहे. दोघेही ठाकरे कुटुंबातील प्रमुख नेते असून, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या त्यांच्या पक्षांनी मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केल्यानंतर दोघांमधील राजकीय आणि वैयक्तिक मतभेद सर्वश्रुत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांच्यातील दुरावा कमी होताना दिसला.

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती, परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.

दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, “आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,” असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगितले.