स्वामी मळ्यात सांडपाणीमुळे आरोग्य धोक्यात

 इचलकरंजी, येथील स्वामी मळा परिसरातील फरशी कारखाना गल्ली याठिकाणी असलेली सार्वजनिक गटार खाजगी जागेतून जात असल्याचे कारण सांगत गटार बंद करण्यात आली आहे. परिणामी भागातील सांडपाणी साचून राहू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसल्याने सांडपाणी साचून तळे साचत आहे. ही गैरसोय तातडीने दूर न केल्यास ४ ऑगस्टपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्याचा इशारा भागातील नागरिकांनी दिला आहे.

 भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्यासह भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त अशोक कुंभार यांची भेट घेत समस्या मांडली. फरशी कारखाना गल्लीत पूर्वीपासुन सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था होती. परंतु काही महिन्यांपूर्वी याच भागातील अॅड. मुजावर यांनी सार्वजनिक गटार ही स्वत:च्या मिळकतीतून जात असल्याचे कारण सांगत ही गटार बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांचे सांडपाणी एकाच ठिकाणी साचत आहे.

 सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी व अॅड. मुजावर यांनी बंद केलेल्या गटारीचे पाणी रिकाम्या जागेत साचून तळे साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास होऊन ताप, डेंग्यु असे साथीचे आजार पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. याठिकाणी सांडपाणी निचऱ्यासाठी गटारीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था न केल्यास सोमवार ४ ऑगस्टपासून महापालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 यावेळी राकेश मोरे, रामचंद्र जाधव, आनंद मोरे, अनिल मोरे. सौ. मोरे, सौ. पाटील, सर्जेराव परीट, सुनिल परीट, दत्ता परीट, अभिजित मगदूम यांच्यासह परीसरातील नागरिक उपस्थित होते.