अमेरिकेच्या ‘टेरिफ बॉम्ब’नंतर मोदींचं देशवासियांना आवाहन;

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा ‘मृत अर्थव्यवस्था’ असा उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना एक महत्त्वाचं आवाहन(Appeal) केलं आहे. मोदींनी अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांना चपकार लगावताना भारतीयांना एक खास आवाहन करतानाच भारत लवकरच जागातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचंही नमूद केलं आहे. मोदींनी नेमकं काय आवाहन केलंय …

मोदींनी नेमकं काय म्हटलं?
भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर काय करावे लागेल याबद्दल पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं आहे. देशातील प्रत्येक पक्ष, नेता, नागरिकाने स्वदेशी वस्तूंचा वापर आणि प्रचार केला पाहिजे. आपल्या दुकानांमध्ये फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जातील, याकडे भारतातील व्यापारी, दुकानदारांनी लक्ष दिले पाहिजे. तिच देशाची खरी सेवा ठरणार आहे. स्वदेशी गोष्टींविषयीचा आग्रह आपल्या प्रत्येक कृतीतून दिसला पाहिजे, असं आवाहन(Appeal)मोदींनी भारतीयांना केलं आहे. स्वदेशी वस्तूच विकायचा निर्धार व्यापाऱ्यांनी करावा, असंही पंतप्रधान म्हणाले.

भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तू
“जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने स्वतःच्या आर्थिक हित, प्राधान्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच व्यापाऱ्यांनी दुकानात ठेवल्या पाहिजेत आणि आपण ग्राहकांनीही त्याच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत,” असा आग्रह पंतप्रधान मोदींनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क 25 टक्के करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाराणसी येथे एका कार्यक्रमात मोदी यांनी थेट अमेरिका किंवा ट्रम्प यांचा उल्लेख टाळत भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन केलं आहे.

रशियाकडून लष्करी उपकरणे आणि खनिज तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताला दंडही आकारला आहे. या घडामोडींबाबत मोदींनी, जगातील अर्थव्यवस्था सध्या अस्थिर असून, अशा काळात अनेक देश फक्त आपल्या हितसंबंधांकडे लक्ष देत आहेत. भारतालाही आपल्या आर्थिक हिताबाबत सजग राहावे लागणार आहे. स्वदेशीचा कठोर पुरस्कार आणि सामूहिक प्रयत्नांतूनच आपण भारताला विकसित देश बनवू शकतो, असं मोदी म्हणाले.