फार्मा कंपनीच्या रिॲक्टरमध्ये भीषण स्फोट; आठ जणांचा मृत्यू, 26 जखमी

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका फार्मा कंपनीत (pharma company) रिॲक्टरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 26 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी (30 जून) सकाळी घडल्याची माहिती आहे. मृतांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमायलाराम येथे सिगाची फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये सोमवारी सकाळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. आम्ही घटनास्थळावरून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर आणखी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. संगारेड्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा स्फोट झाला, तेव्हा सिगाची केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये ड्युटीची वेळ होती.

या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.