पंतप्रधानांनी अमेरिका- चीनला ललकारलं म्हणाले ….

भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 12 व्यांदा देशाला संबोधित केलं. अतिशय दिमाखदार आणि लक्षवेधी अशा या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना कैक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या भूमिका मांडला. जागतिक स्तरावर भारतानं वैविध्यपूर्ण कामगिरी केल्याची बाब अधोरेखित करत एका नव्या क्षेत्रातसुद्धा देश उल्लेखनीय कामगिरीसाठी सज्ज असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानुसार यंदाच्या वर्षअखेरपर्यंत म्हणजेच 2025 पर्यंत संपूर्ण भारतीय बनावटीचे सेमीकंडक्टर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच नव्हे, तर भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक विकासाच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

हल्लीच अमेरिकी (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संगणकीय वापरात येणाऱ्या चीपवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार असल्याबाबतचं वक्तव्य करण्यात आलं होतं. असं झाल्यास जगभरात इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, होम अप्लायन्स आणि डिजिटल डिवाईसचे दर गगनाला भिडतील ज्यामुळं आता भारतात सेमीकंडक्टरची निर्मिती सुरू होणं ही बाब अमेरिकेला ललकारण्याहून कमी नाही हेच स्पष्ट होत आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर भारत एक मोठी संधी साधू पाहत असून, या निमित्तानं परराष्ट्रांवर अवलंबून राहण्याचं सत्र मोडित काढू पाहत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, जगभरात चिपची सर्वात मोठी पुरवठा साखळी चीन, तैवान आणि अमेरिकेवर केंद्रीत असल्या कारणानं आता महासत्ता राष्ट्रांच्या यादीत भारत स्थान बनवू पाहत आहे. हे एक असं क्षेत्र आहे, जिथं लाखोंचा रोजगार आणि अब्जावधींची गुंतवणूक सहजगत्या मिळवली जाऊ शकते. थोडक्यात एकिकडे युरोप आणि अमेरिकेकडून चिप निर्मितीत मोठी सुरुवात केली जात असतानाच इथं भारतही एका महत्त्वाच्या क्षेत्पात पदार्पणासाठी सज्ज झाला आहे हेच खरं.