कबुतरखान्यांसंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी पार पडणार आहे. सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याला पक्षी प्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने देखील बंदी कायम ठेवत पक्ष्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. अन्नाअभावी कबुतरांचा मृत्यू होत असल्याने जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. काल दादरच्या कबुदतरखाना येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेनंतर आजच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दादरमधील कबूतरखान्याजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या भागात दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज गुरुवारीही परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सकाळी जैन समाजाचे अनेक बांधव मंदिरात पूजेसाठी येतात. यावेळी पुन्हा गोंधळ निर्माण होऊ नये, म्हणून महापालिका आणि पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता बाळगली आहे. सध्या कबूतरखाना ताडपत्रीने झाकण्यात आला असून त्यामुळे त्याठिकाणी कबूतरांची वर्दळ नाही. मात्र, आजूबाजूच्या इमारतींवर अजूनही मोठ्या संख्येने कबूतर दिसून येत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू केली. यावर जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही दादरमध्ये जैन समाजाच्या आंदोलन केले.
