गडचिरोली शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील काटली गावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या 6 मुलांना अज्ञात ट्रकने (Truck) धडक दिली. या भीषण अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपुरला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. टिंकू नामदेव भोयर (14), तन्मय बालाजी मानकर (16), दुषण दुर्योधन मेश्राम (14), तुषार राजेंद्र मारभते (14) सर्व राहणार काटली अशी मृतांची नावे आहे. धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाला. या घटनेनं नागरिकांनी संताप व्यक्त करत मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार सहाही मुले नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. गडचिरोली-आरमोरी मार्गांवरील काटली गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळील मार्गावर मुलं बसली होती. दरम्यान 5 वाजून 10 मिनिटाच्या सुमारास एका भरधाव अवजड वाहनाने सहाही मुलांना उडवलं. यात टिंकू आणि तन्मय या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे, संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी वाहन व चालकाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचं सांगितलं आहे. तर या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
