कोल्हापूर हातकणंगलेची उमेदवारी गुलदस्त्यातच!

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रान उठवले असून महाविकास आघाडीच्या गोटात अजूनही शांतता आहे. केंद्रीय स्तरावर जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने सध्या तरी महाविकास आघाडीत शांतताच आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर हातकणंगले मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार संजय बाबा घाटगे, काँग्रेसचे बाजीराव खाडे, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे निवडणूक लढवण्यास तयार आहेत. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी आहे.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तुल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे.

महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद ही महायुतीच्या पारड्यात पडली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीसमोर या लोकसभा मतदारसंघात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे आव्हान असणार आहे.महाविकास आघाडीची प्रमुख धुरा माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एका उमेदवारास संमती दिल्यास त्याला कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकमत झाल्यास वरील पाचपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते.

सध्याच्या घडीला महाविकास आघाडीत गोकुळचे संचालक चेतन नरके यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. अनेक इच्छुक उमेदवाराची घोषणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करणार आहेत पण या परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे.कोल्हापूर पाठोपाठ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार असे दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले किंवा कोल्हापूर यापैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला द्यावा, अशी मागणी केलेली आहे. भाजपच्या या मागणीमुळे या दोन्ही मतदारसंघातील राजकीय चित्र पालटू शकते. हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तरीही हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वजण सावध पावले टाकत आहेत.हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून कोणतीच हालचाल नसल्याचे दिसून येत आहे. इतर ठिकाणी भाजपने दंड थोपाटले असताना या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा निर्णय होत नाही.

महायुतीकड़न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी भाजपच्या इतर नेत्यांच्या पाठिंबाची बेरीज व अटी घालून शिंदे गटात प्रवेश केला आहे.जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार सांगत आहेत. तर दुसरीकडे राज्यस्तरीय आणि केंद्रीय पातळीवरून जे सर्व्हे केलेत, त्यानुसार मंडलिक-माने यांची उमेदवारी बदलली जाणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपल्या आणि मित्रपक्षांची जागा गमवायची नाही. त्यामुळे सध्या तरी महायुतीकडून उमेदवार कळेना, अशी परिस्थिती हातकणंगले मतदारसंघात झाली आहे.