स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) आपल्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत जाहीर केले की त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आता यूट्यूबवर फक्त 50 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. ही खास ऑफर 15 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंतच लागू राहणार असून तो फक्त आमिर खान टॉकीजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेल जनता के थिएटरवर उपलब्ध असेल.
आमिर खान प्रोडक्शन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आमिर खानने प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर प्रेक्षकांना घरबसल्या कमी किमतीत चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. आमिर खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या इंडिपेंडन्स डे वीकेंडला फक्त 50 रुपयांमध्ये यूट्यूबवर पाहा ‘सितारे जमीन पर’.
20 जून 2025 ला झाला होता प्रदर्शित
आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आमिर खान प्रोडक्शन्स आणि अपर्णा पुरोहित यांनी रवी भागचंदका यांच्या सहनिर्मितीत साकारला आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित हा चित्रपट 20 जून 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
चित्रपटाने किती कमाई केली?
सुपरस्टार आमिर खानच्या ‘सितारे ज़मीन पर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. विविध विश्वसनीय दर्जेदार स्त्रोतांनुसार या चित्रपटाने भारतात सुमारे 167.45 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाने जगभरात 267.5 कोटींची कमाई केली आहे.
