पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आज 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. दिवाळीत नागरिकांना अनपेक्षित भेट मिळण्याची शक्यता आहे. भाषणात मी दिवाळीला तुम्हाला डबल धमाका देणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, ‘आम्ही पुढच्या पिढीसाठी टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे ध्येय सर्व प्रकारच्या सुधारणा घडवून आणणे हेच आहे. या दिवाळीत मी तुमच्यासाठी दुहेरी भेट देणार आहे. देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. जीएसटी दरांचा आढावा घेणे ही काळाची गरज आहे. आम्ही नवीन पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. सामान्य लोकांसाठी कर कमी केले जातील. जीएसटी दर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील.’
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. आज, 15 ऑगस्ट रोजी, मी माझ्या देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहे. प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना आजपासून लागू करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारकडून 15,000 रुपये दिले जातील.
