डबेवाल्यांना मुंबईत मिळणार हक्काचे घर ! 25 लाखांत 500 स्क्वेअर फुटाचे घर

मुंबईत (Mumbai) घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा भावाने वाढताहेत. अशात सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे अवाक्याच्या बाहेर गेले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डबेवाल्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईचा डबेवाले गेल्या 125 वर्षांपासून मुंबईत सेवा देत आहेत. मुंबईच्या जडण-घडणीत यांचादेखील मोलाचा सहभाग आहे. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या डबेवाल्यांना आता मुंबईत ह्क्काचं घर मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला बांधवांसाठी 500 चौरस फुटांचे घर 25.50 लाख रुपयांत देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली.

135 वर्षांच्या प्रवासात डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पिढ्यान पिढ्या काम करत असतानाही निर्वयनही राहणं हे प्रेरणादायी आहे. काही लोकांनी त्यांचा उपयोग केला. मात्र त्यांना घर काही मिळालं नाही. आम्ही सांगितलं तुम्ही पुढाकार घ्या आपण कारवाई करु. चांगल्या प्रकारची घरं देऊ शकू याचा प्रयत्न करायचा आहे. मुंबईत 25 लाख 50 हजार रुपयांत 500 चौरस फुटाचे घर डबेवाल्यांना मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले, डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे केंद्र ठरून मुंबईची ओळख द्विगुणित करेल. आ. श्रीकांत भारतीय यांनी जगातील 27 विद्यापीठे संशोधन करीत असलेल्या डबेवाल्यांच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले.