‘वॉर 2’ चित्रपटासाठी चाहत्यांनी हद्द ओलांडली ?

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा ‘वॉर 2’ (‘War 2’) 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. सकाळपासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी लोक पहाटेपासूनच थिएटरच्या बाहेर रांगा लावून थांबले होते. काही चाहते तर रात्रीपासूनच थिएटरसमोर थांबले होते, जेणेकरून पहिला शो चुकू नये.

थिएटरच्या बाहेर सणासारखं वातावरण होतं. ढोल-ताशांच्या गजरात चाहते नाचत होते, पोस्टर्स आणि बॅनर्स लावले होते. ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांनी एक मोठा कटआउट उभारून त्यावर हार चढवला, फटाके फोडले आणि आतषबाजी केली. एवढंच नाही, तर काही चाहत्यांनी एनटीआरच्या कटआउटला रक्ताचा टिळा लावून आपलं प्रेम आणि वेड दाखवलं. हृतिकचे चाहतेही त्यांचे फोटो, पोस्टर्स घेऊन मोठ्या उत्साहात आले होते.

चित्रपट सुरू होताच थिएटरमध्ये जल्लोष उसळला. हृतिक किंवा एनटीआर स्क्रीनवर दिसताच टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्या सुरू झाल्या. अ‍ॅक्शन सीनदरम्यान प्रेक्षकांच्या खुर्च्या अक्षरशः हलत होत्या, इतका उत्साह होता. इंटरव्हलला तर लोकांनी सोशल मीडियावर थेट व्हिडीओ टाकून वातावरण दाखवलं.

‘वॉर 2’ मध्ये दमदार अ‍ॅक्शन, थरारक स्टंट्स आणि ट्विस्टने भरलेली गोष्ट आहे. हा चित्रपट ‘यशराज स्पाय युनिव्हर्स’चा भाग असून, कथेत दोन मोठे एजंट्स एकत्र येऊन एका मोठ्या मिशनवर निघतात. हृतिकची स्टाइल आणि एनटीआरचा पॉवरफुल अंदाज यामुळे प्रत्येक सीन आकर्षक वाटतो. गाण्यांचा आणि बॅकग्राउंड म्युझिकचा अ‍ॅक्शनसोबत मस्त ताळमेळ साधला आहे. या चित्रपटात हृतिक आणि एनटीआरसोबत कियारा अडवाणी देखील आहे. चित्रपट रिलीज होण्यापुर्वी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या एका गाण्यामधून कियारा अडवाणीचे काही सीन काढून टाकले आहेत. सीबीएफसी चित्रपटातील कियारा अडवाणीचे सीन 50 टक्के कमी करण्यास सांगितले आहे.या निर्णयामुळे कियाराचे चाहते नाराज झाले आहेत.